मनसेसोबत आघाडीसाठी भाजपमध्ये बिघाडी
फडणवीस, आणि चंद्रकांतदादापाटील यांच्यात मतभेत
फडणवीस म्हणतात एकला चलो, पाटील म्हणतात मनसेला सोबत घेऊ
पुणे : मनसेसोबत युती करण्याबाबत महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रमुख दोन नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतली असल्याने त्याच्यात मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे. या बाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील अजूनही मनसेला सोबत घेऊन त्यांच्यासोबत युती करण्यावर ठाम आहेत. भाजपच्या या दोन प्रमुख नेत्यांमध्येच मतभेद दिसून येत असल्याने इतर नेते आणि कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत.
भाजप-मनसे युतीचे वारे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतआहे.. पण माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यावर गुरुवारी ( दि. ११ ) आले असताना पुणे महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. स्वबळाची घोषणा करून काही तास उलटत नाही तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र मनसेने भूमिका बदलली तर युती शक्य असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे.
मनसे बाबत भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, कोणाची आम्हाला गरज नाही. आमच्याच ताकदीवर आम्ही निवडणुक लढवू अन् जिंकू शकतो, असा आत्मविश्वास देखील फडणवीस यांनी दाखविला आहे.
या वेळी झालेल्या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित नव्हते. पण चंद्र्कात पाटील यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेससोबत आगामी निवडणुकांत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राहिला प्रश्न मनसेचा. त्यांनी त्यांची भूमिका बदलावी असे आम्हाला वाटते. त्यांनी जर भूमिका बदलली तर त्यांच्यासोबत युती शक्य आहे, असेही पाटील म्हणाले.
'आघाडी'ने कसली कंबर
दरम्यान, भाजप सत्तेत येऊ नये यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. हे पक्ष अधिकृतरित्या सोबत येणार नाहीत. पण सामंजस्याने एकत्रित निवडणुक लढवतील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
Comments
Post a Comment